Join us  

मातंग समाजाचे ८ टक्के स्वतंत्र आरक्षणासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 5:18 AM

मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये ८ टक्के स्वतंत्र आरक्षण आणि बाबासाहेब गोपले यांच्या चेंबूर येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामास तत्काळ सुरुवात करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मंगळवारी आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन केले.

मुंबई : मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये ८ टक्के स्वतंत्र आरक्षण आणि बाबासाहेब गोपले यांच्या चेंबूर येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामास तत्काळ सुरुवात करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मंगळवारी आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन केले.अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीच्या प्रमुख कुसुम गोपले यांनी या वेळी मशाल पेटवत आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य् न केल्यास पुढील लढाई रस्त्यावर करण्याचा इशारा गोपले यांनी दिला. गोपले म्हणाल्या, स्वतंत्र आरक्षणासह क्रांतिसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या चेंबूरच्या सुमननगरमधील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजनाचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पाळावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी शासनाने २ हजार कोटींचे भाग भांडवल देण्याची गरज आहे. भूमिहिनांच्या नावे गायरान जमिनीचे पट्टे करावेत. विधवा व परितक्त्या महिलांना शासनाने दरमहा १० हजार मानधन द्यावे.मुख्यमंत्र्यांनी मातंग समाजासाठी ५० हजार घरे उभारण्याचे मान्य केले होते. त्याची अंमलबजावणी करावी, बंद असलेले साठे महामंडळ सुरू करून, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र २५ कोटींची तरतूद करावी आदी मागण्या संघटनेने केल्या.