मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड येथील माउंट मेरी जत्रा रविवारपासून प्रारंभ झाली. माउंट मेरीच्या दर्शनासाठी ख्रिश्चन बांधवांसह इतर धर्मीयांनीही पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. माउंट मेरीच्या बाहेरील भागात मेणबत्ती आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेर गर्दी होती. संपूर्ण परिसरात सजावट व आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे, तसेच गोडधोडाच्या खाद्यपदार्थांचे स्टॉलही सज्ज झाले आहेत. माउंट मेरी जत्रा १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.माउंट मेरीच्या जत्रेला सर्वधर्मीय लोकांची असणारी उपस्थिती हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिसरात आठ दिवसांच्या कालावधीसाठी मेणबत्ती, मेवामिठाई, खेळण्याची दुकाने सजली आहेत.भाविकांतर्फे माउंट मेरीला मेणबत्त्या, मेणाच्या वस्तू, प्रसाद, हार-फुले आदी वस्तू अर्पण केल्या जातात. कोट्यवधींची उलाढाल येथे दरवर्षी होत असते.येथील स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होते. माउंट मेरीच्या जत्रेला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून प्रवेश दिला जात आहे.
माउंट मेरी जत्रेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 02:24 IST