Join us

बसचालकाला नेले माथेफिरूने फरफटत

By admin | Updated: August 13, 2015 00:36 IST

शिवनेरी बसची तोडफोड करून तरुणाने बसचालकाला कारसोबत फरफटत नेल्याचा प्रकार रबाळे येथे घडला आहे. सिग्नलवर झालेल्या किरकोळ अपघातावरून कारचालकाने बसची

नवी मुंबई : शिवनेरी बसची तोडफोड करून तरुणाने बसचालकाला कारसोबत फरफटत नेल्याचा प्रकार रबाळे येथे घडला आहे. सिग्नलवर झालेल्या किरकोळ अपघातावरून कारचालकाने बसची तोडफोड केली होती. या कारचालकाला कुर्ल्यातून अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.ठाणे - बेलापूर मार्गावर रबाळे येथे २७ जुलै रोजी सकाळी हा प्रकार घडला होता. सिग्नलवर झालेल्या वादातून शिवनेरी बसच्या चालकाला तरुणाने मारहाण करून बसचीही तोडफोड केली होती. तसेच तो पळून जात असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बसचालकाला त्याने कारसोबत फरफटत नेले होते. भररस्त्यात झालेल्या या थरार नाट्यात शिवनेरी बसचालकाचे प्राणही जाण्याची शक्यता होती. परंतु कारच्या बोनेटवर बसचालक लटकत असतानाही तो भरधाव वेगात कार पळवत होता. घटनेनंतर चार दिवसांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. हुनायुन अन्सारी (३१) असे त्याचे नाव असून तो कुर्ल्याचा राहणारा आहे.स्वारगेटवरून आलेली शिवनेरी बस (एमएच ०४ एफके ७६) ठाण्याला जात असताना रबाळे सिग्नलवर उभी होती. बसच्या पुढेच उभ्या असलेल्या अन्सारीच्या कारला (एमएच०२ बीजी ९७७२) बसची किरकोळ धडक झालेली. यावरून त्याने लोखंडी रॉडने बसची तोडफोड केलेली. शिवाय बसचालक संतोष शिलीमकर (३७) यालाही डोक्यात घाव घालून जखमी केले होते. यानंतर हुनायुन कारसह पळून जात असताना संतोष त्याच्या कारला आडवा गेला. त्यामुळे हुनायुनने त्याला कारची धडक देवून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. कारच्या धडकेनंतरही बोनेटवर पडलेला संतोष पाठलाग सोडत नसल्याने हुनायुनने त्याला ३०० मीटरपर्यंत कारसोबत फरफटत नेले. (प्रतिनिधी)वाहतूक पोलिसानेही कार अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही अन्सारी थांबला नव्हता. काही अंतरावर संतोष रस्त्यावर पडला असता त्याच्या पायावरून कार नेवून तो फरार झाला. या प्रकारात संतोष शिलीमकरच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. ऐरोलीतील रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार दिसून आला. यातील चित्रित कारच्या नंबरवरुन अन्सारीला ३१ जुलैला कुर्ल्यातून अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. सध्या तो जामिनावर आहे. तो वापरत असलेल्या कारचा मूळ मालक वेगळा असून त्याने काही महिन्यांपूर्वी कार विकत घेतली.