Join us

टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने मोटारसायकल पळवली

By admin | Updated: January 22, 2015 01:14 IST

मोटारसायकल खरेदी करण्यापूर्वी ती पाहण्यासाठी बोलावून मोटारसायकल घेऊन चक्क एकाने पळ काढल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे.

नवी मुंबई : मोटारसायकल खरेदी करण्यापूर्वी ती पाहण्यासाठी बोलावून मोटारसायकल घेऊन चक्क एकाने पळ काढल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. ओएलएक्स या आॅनलाइन साईटवर सदर मोटारसायकलची जाहिरात पाहून अज्ञाताने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओएलएक्स पे बेच दो असे करत सध्या अनेकजण वापरलेल्या वस्तूंची जाहिरात सदर साईटवर करत आहेत. मात्र त्यावर झळकणाऱ्या जाहिरातींवर चोरट्यांची देखील नजर असल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव खारघरच्या मनोज शिंदे या तरुणाने घेतला आहे. मनोज याने त्याची पल्सर मोटरसायकल विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात करून स्वत:चा मोबाइल नंबर देखील दिला होता. त्यानुसार मुनाफ नावाच्या व्यक्तीने मनोजला फोन करून खारघर रेल्वे स्थानक येथे बोलावून घेतले. त्यानुसार मनोज हा मोटरसायकल घेऊन खारघर रेल्वेस्थानक येथे गेला होता. यावेळी कागदपत्रे हातात घेऊन टेस्ट ड्राईव्ह करतो असे सांगून मोटारसायकलीसह पळ काढला. १६ जानेवारीला हा प्रकार घडला असून याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.