मुंब्रा : स्वत:च्या आजारपणाला कंटाळून एका आईने तिच्या चिमुरड्या मुलाची हत्या करून, दुसऱ्या मुलास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना दिव्यात घडली. यामुळे दिव्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. येथील मुंब्रादेवी कॉलनीतील वैभव कॉम्प्लेक्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारी संपा कर्मकार ही महिला मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, कावीळ, न्यूमोनिया या आजारांनी त्रस्त आहे. या आजारपणात स्वत:च्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास मुले उघड्यावर पडतील, तसेच त्यांचे हाल होतील, या भीतीने तिला ग्रासले होते. मागील काही दिवसांपासून संपा विमनस्क अवस्थेत वावरत होती. बुधवारी संध्याकाळी तिने तिचा पावणेदोन वर्षांचा मुलगा ईशान याच्या गळ्यावर आणि पोटावर विळीने वार करून त्याची हत्या केली. चयन या ११ वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तिला पोलिसांनी अटक केली असून, मानसिक संतुलन ढासळलेल्या संपाला न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
आजारपणाला कंटाळून आईने केली मुलाची हत्या; दुसरा मुलगा वाचला
By admin | Updated: July 15, 2016 03:19 IST