Join us  

नातवाची उलटी साफ केली नाही म्हणून सासूची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:10 AM

पायधुनीतील रॅपीड हाइट्स या उच्चभ्रू इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुमय्या अफजल कोळसावाला

मुंबई : नातवाची उलटी साफ करण्यास नकार दिल्याच्या रागात सुनेनेच वृद्ध सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना पायधुनीत घडली. हत्येनंतर त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान नातवानेच आईच्या कृत्याला वाचा फोडली आणि पायधुनी पोलिसांनी आमरिन कोळसवाला हिला सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.

पायधुनीतील रॅपीड हाइट्स या उच्चभ्रू इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुमय्या अफजल कोळसावाला (६२) या मुलगा, सून आणि तीन नातवांसोबत राहायच्या. मुलगा कॉस्मेटिक फार्मा कंपनीत नोकरीवर आहे. रविवारी आमरिन या बाथरूममध्ये कपडे धूत होत्या. त्याच दरम्यान सुमय्या फळ कापत असताना, दुपारी दोनच्या सुमारास अडीच वर्षाचा नातवाने उलटी केली. आमरिनने त्यांना उलटी साफ करण्यास सांगताच फळ कापत असल्याने सुमय्यांनी तिला नकार दिला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याच रागात आमरिनने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या हातातील चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले. आमरिन भानावर येईपर्यंत सुमय्या यांनी प्राण सोडले होते.असा झाला हत्येचा उलगडा!दुपारी तीनच्या सुमारास याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुमय्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. पुढे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. तपासादरम्यान त्यांनी तिन्ही मुलांकडे चौकशी सुरू केली. चौकशीत यातील मोठ्या ७ वर्षांच्या मुलाने आईनेच चाकू मारल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी आमरिनकडे चौकशी करताच, तिने गुन्ह्याची कबुली देत वरील घटनाक्रम सांगितला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी