Join us  

कार्यालयांनी वेळा बदलल्या; आता तरी लोकल वेळेत चालवा, रेल्वे संघटनांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:43 AM

रेल्वे प्रशासन ढिम्म असून, यावर काहीच कारवाई करीत नाही, असे म्हणत रेल्वे प्रवासी संघटनांनी आगपाखड केली आहे.

मुंबई : लोकलच्या गर्दीमधून पडून प्रवाशांचे नाहक बळी जाऊ नयेत आणि लोकलची गर्दी कमी व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बहुतेक कार्यालयांनी आपल्या कामांच्या वेळात बदल केले. त्यानुसार, रेल्वेने आपल्या वेळापत्रकात बदल करणे आणि अतिरिक्त फेऱ्या चालविणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वे प्रशासन ढिम्म असून, यावर काहीच कारवाई करीत नाही, असे म्हणत रेल्वे प्रवासी संघटनांनी आगपाखड केली आहे.

लोकलला एकाच वेळी होणारी गर्दी विभागली जावी म्हणून मध्य रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी कार्यालयांना वेळा बदलण्याचे आवाहन केले होते. रेल्वेच्या आवाहनाला अनुसरून मुंबईतल्या केंद्रीय, राज्य शासन व खासगी कार्यालयांनी आपली कार्यालये सुरू होण्याच्या वेळात बदल करण्यास सुरुवात केली. 

कार्यालये सुरू होण्याच्या वेळा सकाळी ८:३० ते १२:३० व कार्यालये बंद होण्याच्या वेळा दुपारी ४:३० व ८:३० दरम्यान बदलण्यात आल्या. मध्य रेल्वेने या बदललेल्या वेळांना अनुसरून असे सुधारित वेळापत्रक करणे अपेक्षित आहे. किंवा त्यानुसार, लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालविणे अपेक्षित आहे. मात्र, रेल्वे यावर ठोस असा तोडगा काढत नाही, असे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळा बदलूनही कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई मंडळ मध्य रेल्वे यांनी लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी साधारणपणे ८०० हून अधिक कार्यालयांना वेळा बदलण्याची विनंती केली आहे. अद्यापपर्यंत केवळ ३३ कार्यालयांनी यासाठी संमती दिली आहे. मध्य रेल्वे सर्व कार्यालयांना ही विनंती करते की, आपण सर्वांनी स्वयंस्फूर्तीने कार्यालयाची वेळ बदलण्याचा प्रयत्न करावा; ज्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सोयीस्कर होईल आणि धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल.- डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मध्य रेल्वे स्वत:चे अपयश लपविण्यासाठी कार्यालयांना वेळा बदलण्याचे आवाहन करत आहे. आवाहनाच्या प्रतिसादाला दाद देत नाही, हे वाईट आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ

पहिल्याच दिवशी लेटमार्क-

मध्य रेल्वेने सोमवारीही आपल्या लेटमार्कचा कित्ता गिरविला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विलंबाने धावत होती. रेल्वेच्या लेटमार्कवर रेल्वे प्रवाशांनी समाजमाध्यमांवर जाब विचारत रोष व्यक्त केला होता.

३२ कार्यालयांनी वेळा बदलल्या-

१) मध्य रेल्वे १८१० सेवांसह मुंबईतील उपनगरीय प्रणालींपैकी एक चालवते. ज्यात ६६ वातानुकूलित सेवांचा समावेश आहे. 

२) गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याचे आवाहन केले होते. ३२ सरकारी, खासगी कार्यालयांनी याकामी रस दाखवला, अशी माहिती रेल्वेने दिली होती.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे