मुंबई : केरळमध्ये शुक्रवारी मान्सून दाखल झाला असतानाच मुंबईवरही दाटून आलेल्या ढगांमुळे येथे काहीशा सरी पडल्या. तुरळक ठिकाणी पडलेल्या या सरींचे प्रमाण कमी असले तरीदेखील पुढील ४८ तासांत मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना हा मान्सूनपूर्व पाऊस काहीसा दिलासा देणार आहे.गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईमध्ये तापमानाचा पारा वाढलेला होता. मे महिन्याच्या शेवटी तर मुंबई शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर गेल्याने आणि आर्द्रतेत वाढ झाल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यात गेल्या दोनएक दिवसांपासून मुंबईवर दाटून येणारे मळभ उकाड्यात आणखी भर घालत होते. शुक्रवारी दाटून आलेल्या ढगांमुळे काहीशा सरी पडल्याने आता मुंबईकर चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहू लागला आहे.शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात ढग दाटून आले होते. तर दुपारी ढगांची चादर ओसरली होती. आणि सायंकाळी पुन्हा शहरासह उपनगरावर ढग दाटून आले होते. या दाटून आलेल्या ढगांमुळे सकाळी आणि सायंकाळी कुलाबा, फोर्ट, भायखळा, गिरगाव, लालबाग, परळ, दादर, वडाळा, धारावी आणि सायनसह उपनगरातही काही ठिकाणी तुरळक सरी पडल्याचे चित्र होते. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST