Join us

राज्याच्या तुलनेत पुण्यात अधिक लसीचे डोस जातात वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना लसीकरणाला वेग येत असला तरी राज्याच्या तुलनेत पुण्यात लसीचे डोस वाया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना लसीकरणाला वेग येत असला तरी राज्याच्या तुलनेत पुण्यात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण सरासरी ५.२ टक्के आहे, तर पुण्यात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण तब्बल आठ टक्के असल्याचे दिसून आले. मात्र एकूणच लसीकरण मोहिमेत दहा टक्के लसीचे डोस वाया जाऊ शकतात, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात नुकतेच कोविशिल्ड लसीचे ५.२८ लाख डाेस उपलब्ध झाले, त्यातील ३.८२ लाख डोस वापरण्यात आले, तर १.६७ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. यात एकूण ३३ हजार लसींचे डोस वाया गेले. तर, कोव्हॅक्सिनचे १.१२ लाख डोस उपलब्ध झाले होते, त्यातील ६६ हजार डोस वापरण्यात आले असून ३९ हजार शिल्लक आहेत. या लसीचे ६ हजार ४४ डोस वाया गेले. दोन्ही लसींचे वाया जाण्याचे प्रमाण काहीसे सारखेच असल्याचे दिसून आले. राज्यात पुण्यात सर्वाधिक लसीचे डोस वाया गेल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, राज्यात लसीचे डोस वाया जाण्याचे सरासरी प्रमाण ५.२ टक्के आहे. लसीचे डोस वाया जाण्याची विविध कारणे आहेत, मात्र इतक्या व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतल्यानंतर या दरम्यान १० टक्के लसीचे डोस वाया जाण्याची शक्यता असते. अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणानंतरही काळजी घेणे आवश्यक असून कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेही गरजेचे आहे. राज्यासाठी केंद्राकडून ३३ लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील लसीच्या डोसचा साठा पडताळून अधिकचा साठा पुरविण्यात येईल.

...........................