Join us

मुंबईतील पाच हजारांहून अधिक नमो वॉरियर्स पंतप्रधान मोदी यांचा प्रचार करतील - तेजिंदर सिंग तिवाना

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 27, 2024 19:19 IST

कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष अँड. आशिष शेलार  यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुंबई- भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक विकास योजना आणि यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या हितासाठी केलेल्या विविध कामांची जनजागृती करण्यासाठी, युवकांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरीता आज खालसा महाविद्यालय माटुंगा सर्कल, माटुंगा (पूर्व) येथे "नमो वॉरियर्स" कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष अँड. आशिष शेलार  यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार कालिदास कोळंबकर ,आमदार प्रसाद लाड, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, भाजपा मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजयुमो, मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई मुंबईतील १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये “नमो वॉरियर्स” कार्यक्रम आयोजित करेल आणि प्रत्येक महाविद्यालयातून ५० नमो वॉरियर्स तयार करेल. अशाप्रकारे मुंबईतील पाच हजार तरुणांना नमो वॉरियर बनवले जाईल. ज्याची सुरुवात आज खालसा महाविद्यालयापासून झाली आहे. नमो वॉरियर्स बनलेल्या तरुणांना भाजयुमो मुंबईकडून प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना ओळखपत्र देखील दिले जाईल. यानंतर हे नमो वॉरियर्स पंतप्रधान मोदी यांच्या लोककल्याणकारी योजना आणि २०२४  च्या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामांचा प्रचार करतील. 

यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “आम्ही १८ ते २५ वयोगटातील तरुणांना नमो वॉरियर्स बनवणार असून हे युवक नवीन मतदार देखील आहेत.पंतप्रधानांनी युवकांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक योजना सुरू केल्या आणि राबवल्या यासोबतच मोदीजींनी अनेक योजना राबवल्या ज्यांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होत आहे. नमो वॉरियर्स या सर्व सार्वजनिक विकास योजना मुंबईच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातील आणि यावेळी पक्षाच्या ४०० जागा पार करण्यासाठी आपले योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :मुंबई