Join us  

भुयारी मेट्रो तीनचे निम्म्याहून अधिक बांधकाम पूर्ण; तासाभरापेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 2:38 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू असून प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५ टक्के भुयारीकरण आणि निम्म्याहून अधिक म्हणजे ५९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यासह प्रणाली यंत्रणेची कामेदेखील प्रगतिपथावर आहेत.

सद्य:स्थितीनुसार एकूण २ मेट्रो स्थानकांच्या स्टेशन बॉक्सचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विधानभवन स्थानकाचे ७५.४५ टक्के आणि एमआयडीसी स्थानकाचे ७८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानकांच्या बांधकामांतर्गत स्थापत्य कामांमध्ये भुयार आणि भूमिगत स्थानकांच्या निर्मितीचा समावेश आहे.

भुयारीकरण टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम)द्वारे केले जात आहे. स्थानकांची निर्मिती कट अ‍ॅण्ड कव्हर (सी अ‍ॅण्ड सी) व न्यू आॅस्ट्रियन (एनएटीएम) पद्धतीचा वापर करून केली जात आहे. यामुळे एक तासापेक्षा कमी वेळेत कफ परेड ते सीप्झपर्यंत प्रवास शक्य होणार आहे. एकूण २६ भूमिगत स्थानकांपैकी १९ स्थानके कट अ‍ॅण्ड कव्हर पद्धतीने व उर्वरित ७ स्थानके एनएटीएम आणि सी अ‍ॅण्ड सीच्याविविध संयोजनांचा वापर करून बांधली जात आहेत.

पर्यावरण रक्षणास प्राधान्य

च्सर्वात जास्त रहदारीच्या ठिकाणावर परिवहन सेवा उपलब्ध असेल. नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ या प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे यांना तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोडले जाणार आहे.च्अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि मनोरंजन केंद्रे यांनाही मार्गिका जोडली जाईल. च्यामुळे प्रतिवर्ष २.६१ लाख टन कार्बनडाय आॅक्साइडची निर्मिती घटेल, प्रदूषणास आळा बसेल, असा दावा केला जात आहे. मुंबई मेट्रो-३ ची अंदाजित प्रवासी संख्या दररोज १७ लाख (२०३०) एवढी अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो