Join us  

भारतात कुपोषणापेक्षा अतिखाण्यामुळे जास्त मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 2:43 AM

डॉ. जगन्नाथ दीक्षित : लठ्ठपणा ही जीवनशैलीशी संबंधित समस्या

डोंबिवली : लठ्ठपणा ही सध्याची सर्वात गंभीर समस्या बनली आहे. आपल्या जीवनशैलीतूनच ही समस्या उद्भवलेली आहे. त्यामुळे आपल्यालाच त्यावर उपाय शोधावा लागेल. मात्र, आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महागडी औषधे खरेदीच्या आहारी जातो आणि हाती काहीच लागत नाही. आहाराबाबत थोडीशी खबरदारी घेतल्यास यामध्ये दिलासा मिळू शकेल. दिवसातून दोन वेळा पोटभर जेवा. मात्र, अधूनमधून खाणे टाळा, असा मूलमंत्र देताना भारतात कुपोषणापेक्षा जास्त मृत्यू हे अतिखाण्यामुळे होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले.

विज्ञान संमेलनात रविवारी ‘लठ्ठपणा आणि मधुमेह’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी डॉ. उल्हास कोल्हटकर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, लठ्ठपणा वाढल्यामुळे ब्लडप्रेशर वाढतो. गर्भधारणेत अडथळे येतात. आवश्यक नसताना खाणे हे लठ्ठपणा येण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे खाण्याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. महिला अन्न वाया जाईल, म्हणून अधिक खातात. घरातील डस्टबिनची काळजी त्या घेतात. मात्र, आरोग्याची घेत नाहीत. जेवणाच्या वेळा निश्चित करा. कडक भूक केव्हा लागते, हे पाहा. जेवण ५५ मिनिटांत संपवा. दोन जेवणांमध्ये काहीही खाऊ नका. जेवताना शक्यतो गोड कमी खा. जेवणात प्राथिनांचा समावेश अधिक असायला हवा. शाकाहारी लोकांनी प्राथिनांसाठी चीज, दूध, मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. दोन जेवणांच्या दरम्यान पाणी, ताक, टोमॅटोच्या एकदोन फोडी, ग्रीन टी, ब्लॅक टी, २५ टक्के दुधाचा चहा किंवा ७५ टक्के पाण्याचा बिनसाखरेचा चहा घ्यावा. मधुमेही रुग्णांनी केवळ पाणी किंवा ताक घ्यावे. हे प्रयोग १८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांनी, तसेच गर्भवती व ज्यांचे बाळ नऊ महिन्यांच्या आत आहे, अशा मातांनी करू नये, असेही त्यांनी सांगितले.जेवणाच्या ताटात काय असावे?जेवताना प्रथम फळ, डायफ्रूट, गोड पदार्थ, सॅलड, पोळीभाजी, वरणभात या पद्धतीने जेवण घ्यावे. दररोज या सर्व पदार्थांचा समावेश जेवणात असणार नाही. मात्र, साधारण या पदार्थांचा आहारात समावेश असावा. वजन वाढविण्यासाठी काही वर्षे लागली असल्याने, ते कमी होण्यासाठी किमान तीन महिने हा प्रयोग करून पाहा, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

टॅग्स :अन्नमुंबई