मुंबई – मुंबईत वाढत्या कोरोना संसर्गामुळे चाचण्यांच्या क्षमतेत दिवसागणिक वाढ करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापर्यंत शहरात २० हजार कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यात वाढ करून आता दैनंदिन चाचण्यांची क्षमता ४० हजारांहून अधिक करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, शहर उपनगरातील लोकसंख्येची घनता पाहता अँटीजन चाचण्यांचे प्रमाण अधिक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दिवसाला सरासरी २० हजार ७१४ कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. या चाचण्यांचे प्रमाण वाढवून २४ ते ३० मार्च दरम्यान दिवसाला ४१ हजार २७१ चाचण्या इतके करण्यात आले. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दिवसाला ६ हजार ४१४ अँटीजन चाचण्या करण्यात येत होत्या, तर हे प्रमाण वाढून गेल्या आठवड्यात २१ हजार ४५७ अँटीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
अँटीजन चाचण्यांचा अहवाल अर्ध्या तासात मिळतो, तर आरटीपीसीआर चाचण्यांकरिता २४ तासांसाठी प्रतीक्षा करावी लागते. केंद्र शासनाने ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईची लोकसंख्या पाहता चाचण्यांसाठी पूर्णपणे आरटीपीसीआरवर अवलंबून राहून चालणार नाही. लोकल ट्रेन्स, माॅल्स, रेस्टाॅरंटमधील गर्दीचे निदान करण्यासाठी अँटीजन चाचण्या सोयीस्कर ठरतात. शहर उपनगरात २४ विभागांना दिवसाला १००० चाचण्या करण्यास सांगितले आहे.