Join us  

‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ विषयावर अधिकाधिक भर- डॉ. अशोक आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:20 AM

माता-पित्यांना योग्य शिक्षण मिळणे गरजेचे

- स्नेहा मोरेमुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने हा सप्ताह लोकजागृतीसाठी १९९० पासून सुरू केला होता. प्रारंभी १ आॅगस्ट हा दिवस ‘जागतिक स्तनपान दिन’ म्हणून साजरा व्हावा, अशी संकल्पना होती. पुढे तिचे ‘सप्ताहा’त रुपांतर झाले व पहिला सप्ताह १९५२ मध्ये साजरा झाला. ‘दी र्वल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अ‍ॅक्शन’ ही मलेशियास्थित संस्था १९९१ पासून या सप्ताहासंबंधी विविध घोषणा जाहीर करून१२० देशांमध्ये जनजागृती करीत आहे. स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाच्या महत्त्वाविषयी जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांच्याशी केलेली बातचीत...यंदा स्तनपान सप्ताहाची संकल्पना काय आहे ?‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ हे या वषीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाचे संकल्पना आहे. या संकल्पनेंर्गत बालसंगोपनाच्या वर्तमानातील आणि भविष्यातील वाटचालींचा गर्भितार्थ दडलेला आहे. जागरुक पालकत्व ही काही कायद्याने आणता येणारी बाब नाही. त्यासाठी जनमानसात प्रबोधनाद्वारे स्वभाव घडविणाऱ्या कृती-योजना अंमलात यायला हव्यात. स्तनपान हा निसर्गाचा एक मार्ग असून, ती एक प्रकारची ठेव आहे. त्यासाठी माता-पित्यांना योग्य शिक्षण मिळायला हवे, जेणेकरून ते बालकांना त्यांचा हक्क बहाल करू शकतील. अर्थात, मातेचे आरोग्य या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. माता आरोगी तर बाळ सुदृढ, हे साधे समीकरण आहे.स्तनपान करण्याचे कोणते फायदे असतात ?जन्मणाºया बाळाच्या वाढीसाठी मातेचे दूध अत्यंत गरजेचे असते. दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये समाविष्ट असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जन्मल्यानंतर पाहिल्या एक तासापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर बाळ वाढले पाहिजे. आईचे दूध थेट बाळाच्या तोंडात जात असल्याने ते जंतुविरहित असते. स्तनपान घेणाºया बाळांमध्ये सहसा दमा, त्वचेचे संसर्ग आदी आजारांचा संसर्ग होत नाही. स्तनपानामुळे आईच्या शरीरात आॅक्झिटोसिन हा अंतस्राव तयार होतो. या अंतस्रावामुळे गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते. नियमित स्तनपान केल्यामुळे महिलेच्या शरीरातील प्रोल्याक्टिन बीजकोषातून बीज बाहेर येण्याची क्रिया मंदावते. यामुळे शारीरिक संबंध आले तरी गर्भ राहण्याची शक्यता कमी होते. ही प्रक्रिया साधारण दोन ते चार महिन्यांपर्यंत सुरू राहते.आपल्याकडे स्तनपानाचा टक्का कमी असण्याची नेमकी कारणे कोणती?स्तनपान केल्यामुळे मातेचे शरीराची रचना बिघडते असा एक मोठा गैरसमज आहे. मात्र खरी परिस्थिती या उलट आहे. स्तनपानामुळे आईचे स्तन बेढब होत असले तरी गर्भारपणात वाढलेले वजन स्तनपानामुळे कमी होते. प्रसूत मातेला येणारे पहिले दूध हे घट्ट पिवळसर रंगाचे असते. बोलीभाषेत त्याला बरेचदा ‘चीक’ असे संबोधले जाते. शास्त्रीय भाषेत त्याला ‘कोलेस्ट्रोम’ म्हणतात. याच पहिल्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती कितीतरी पटीने वाढत असते. मात्र नेमके हेच दूध अनेक गैरसमजुतींमुळे फेकून दिले जाते. त्याऐवजी बाळाला मध चाटवणे, साखर-पाणी देणे, गाईचे-शेळीचे दूध देणे अशा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. बाळाच्या जन्मानंतर तासाभराच्या आत मातेचे दूध न देता मध, पाणी, गुटी (प्री-लॅक्टल) यासारखे द्रव पदार्थ दिल्याने त्याचा परिणाम शिशुच्या प्रतिकार क्षमतेवर तर होतच असतो, बरोबरीने मातेवरही होतो.स्तनपान कशा पद्धतीने करावे ?स्तनपान देताना आईने मानसिक ताण, संकोच ठेवू नये. दुधाची निर्मिती व दूध स्रवणे या क्रिया मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. बाळाला स्तनपान देताना बाळाचे कपडे काढून त्याला मोकळे करावे. खुर्चीवर, जमिनीवर किंवा पलंगावर कुठेही बसून स्तनपान द्यायला हरकत नाही. मात्र पाठ अवघडू नये यासाठी पाठीला आधार असावा. अशा वेळी एका कुशीला झोपून स्तनपान दिले तरी चालेल. या वेळी बाळाचे शरीर स्वत:कडे वळवून घ्यावे आणि आईच्या अगदी जवळ असावे. बाळाच्या डोक्याला, मानेला आणि पाठीला एका हाताने आधार द्यावा. आईने दुसºया हाताने स्तनाग्रे आणि स्तनमंडल बाळाच्या तोंडात द्यावे. केवळ स्तनाग्रेच नाही तर स्तनमंडल बाळाच्या तोंडात जाणे आवश्यक आहे. आई व बाळाची स्थिती योग्य असल्याने स्तन व्यवस्थित चोखता येते आणि भरपूर दूध येते. नाही तर स्तनांग्रांवर चिरा पडू शकतात.

टॅग्स :आरोग्य