Join us  

फ्लोरिडा बंदरात ४००  हून अधिक भारतीय नाविक जहाजावर अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:15 PM

मायदेशी परतण्याची आस, परतण्याची प्रक्रिया सुरु

 

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर बंधने असल्याने जगभरात विविध ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एका क्रुझ वर सुमारे चारशे भारतीय कर्मचारी अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्याची त्यांना आस लागली आहे मात्र अद्याप त्यांना त्यांच्या या परिस्थितीतून सुटकेचा काही मार्ग दिसत नसल्याने त्यांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे. याबाबत मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

प्लोरिडा मधील एका खासगी कंपनीच्या मालकीच्या जहाजावर चारशे भारतीय कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून हे जहाज फ्लोरिडा बंदरात नांगर टाकून आहे. मात्र अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवलेला असल्याने या कर्मचाऱ्यांसहित जहाजावरील इतर सर्व कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अडीज महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सुटकेची काही आशा दिसत नसल्याने आता या कर्मचाऱ्यांचा आता धीर सुटु लागला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड 19 ची तपासणी करण्यात आली होती व सर्वांचे तपासणी अहवाल नकारात्मक आलेले आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना सुटकेचा मार्ग सध्या दिसत नसल्याने त्यांच्या मध्ये नाराजी वाढू लागली आहे. या कर्मचाऱ्यांना मायदेशी भारतात परत पाठवण्यासाठी त्यांची कंपनी सर्व व्यवस्था करण्यास तयार अाहे. 

भारत सरकारने या बाबीकडे गांभीर्याने पाहावे व या चारशे कर्मचाऱ्यांना परत मायदेशी सुखरुपपणे आणण्यासाठी  आवश्यक ती पावले उचलावीत व यांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करुन द्यावा, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे अँड गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  परराष्ट्रमंत्री, वॉशिंग्टन डीसी येथील भारताच्या अमेरिकेतील दूतावासाच्या माध्यमातून या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी सर्व आवश्यक तू पावले उचलून लवकरात लवकर त्यांना घरी आणावे अशी मागणी करण्यात आली आहे.  याबाबत केलेल्या संपर्कानंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने संबंधित कंपनीशी संपर्क साधून या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु केल्याची माहिती पिमेंटा यांनी दिली. बुधवारी याबाबत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या