Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी ३५ हजारांपेक्षा अधिक पोलीस तैनात

By admin | Updated: September 16, 2015 11:49 IST

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून, बंदोबस्तासाठी तब्बल ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची

मुंबई : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून, बंदोबस्तासाठी तब्बल ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली. खबरदारीचे सर्व उपाय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आले असून, यादरम्यान पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्याचे भारती म्हणाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मंडळांच्या बैठका घेऊन सतर्कतेच्या सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईतील गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी यंदा सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. मुंबईत सध्या ७ हजार १३ मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, जवळपास ५ हजार छोटी मंडळे आहेत. या मंडळांसोबत बैठका घेण्यात आल्या असून, त्यांच्या समस्या आणि पोलिसांकडून करण्यात आलेले खबरदारीचे उपाय यावर चर्चा करण्यात आली असल्याचे भारती यांनी सांगितले. एखाद्या प्रसंगाला कशा प्रकारे तोंड द्यावे यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंदा पोलिसांच्या मदतीला फोर्स वन, एसआरपीएफ, होमगार्डही असतील. (प्रतिनिधी)ड्रोनचा वापर करणारगणेशोत्सव काळात मुख्यत्वे विसर्जन काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ड्रोनसारख्या यंत्रणेचा वापर करण्याचा विचार पोलिसांकडून केला जात आहे. मात्र तो कसा आणि केव्हा करणार? याची माहिती देण्यास नकार देण्यात आला. लालबाग ते गिरगाव परिसरात २०० सीसीटीव्हीलालबागचा राजा ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा संपूर्ण परिसर या वेळी सीसीटीव्हींच्या देखरेखीखाली राहणार आहे. मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे. प्रथम लालबागचा राजा परिसर ते गिरगाव चौपाटीपर्यंत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.