Join us
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या साडेतीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, ५६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

मुंबई : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या ३ हजार ५२३ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली ...

मुंबई : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या ३ हजार ५२३ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील ५६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात वैमानिकांसह केबिन क्रू मेंबरची संख्या सर्वाधिक असल्याचे कळते.

कोरोनामुळे खासगी विमान कंपन्यांची सेवा मर्यादित प्रमाणात सुरू असली तरी एअर इंडियाने मात्र या संकटकाळात अखंड सेवा दिली आहे. ‘वंदे भारत अभियानां’तर्गत ९० लाखांहून अधिक नागरिकांना परत मायदेशी आणण्यात या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या काळात तब्बल ३ हजार ५२३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आरोग्यसुविधा मिळण्यासाठी विशेष विलगीकरण केंद्रे उभारण्यात आली. तसेच कोरोनाची लागण झाल्यापासून १७ दिवस (विलगीकरण कालावधीत) पगारी रजा देण्यात आली. १४ जुलैपर्यंत एकूण बाधितांपैकी ५६ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पहिल्या टप्प्यात १० लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात ५० लाखांची मदत देण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या वारसांनाही ९० हजार रुपये वा २ महिन्यांचे वेतन भरपाई म्हणून देण्यात येईल, अशी माहिती नागरी उड्डयन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली.