Join us  

मुंबईत पाच वर्षांत अडीच हजारांहून अधिक इमारत दुर्घटना, २००हून अधिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 5:20 AM

मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल २ हजार ७०४ इमारत दुर्घटनांत एकूण २३४ लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल २ हजार ७०४ इमारत दुर्घटनांत एकूण २३४ लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही माहिती उघड केली आहे, तसेच गोरेगाव येथील दुर्घटनेनंतर तरी राज्य शासनाने इमारतींसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था उभारण्याची मागणी शेख यांनी केली आहे.शेख म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडेपाच वर्षांत मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांचा बळी गेला असून, ८४० जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला २०१३ ते २०१८ कालावधीत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत? तसेच दुर्घटनेतील मृत व जखमी लोकांची माहिती विचारली होती. त्याला उत्तर देताना मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा सहायक अभियंता सुनील जाधव यांनी संबंधित माहिती दिली आहे.विशेष व्यवस्था उभारण्याची मागणीगेल्या पाच वर्षांत मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांहून अधिक बळी हे इमारत दुर्घटनांत गेले आहेत. त्यामुळे मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी आपत्कालीन दुर्घटनांना आळा घालण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याची मागणी करणारे पत्र शकील अहमद शेख यांनी मनपा व अग्निशमन दलास पाठविले आहे.2013मध्ये एकूण ५३१ इमारत दुर्घटनांत १०१ नागरिकांचा मृत्यू, तर १८३ जखमी लोक जखमी झाले होते.2014मध्ये एकूण ३४३ इमारत दुर्घटनांत एकूण २१ लोकांचा मृत्यू, तर १०० जखमींची नोंद आहे.2015मध्ये एकूण ४१७ इमारती कोसळण्याची माहिती असून, त्यात १५ लोकांचा मृत्यू आणि १२० लोक जखमी झाल्याची माहिती आहे.2016मध्ये एकूण ४८६ इमारती कोसळण्याची नोंद असून, या दुर्घटनांत २४ लोकांचा मृत्यू आणि १७१ लोक जखमी झाल्याची नोंद आहे.2017मध्ये एकूण ५६८ इमारत दुर्घटनांत ६६ लोकांना हकनाक जीव गमावावा लागला, तर तब्बल १६५ लोक जखमी झाले होते.2018मधील पहिल्या सात महिन्यांतील माहितीमध्ये एकूण ३५९ इमारत दुर्घटनांत ७ लोकांचा मृत्यू आणि १०० जखमींचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई