Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याने एकाच दिवसात दिल्या सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:08 IST

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आल्याने ...

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आल्याने राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. शनिवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून, आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.