Join us  

पीकविम्यासाठी मोर्चा हा शिवसेनेचा‘स्टंट’: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 6:36 PM

मुंबई- सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. ...

मुंबई- सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच आता ते विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा ‘स्टंट’ करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

येत्या १७ तारखेला मुंबईतील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्याबाबत शिवसेनेच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना पीकविम्याचा फायदा न मिळण्यासाठी या योजनेचे जाचक नियम व अटी कारणीभूत आहेत. हे निकष शिथील करण्यासाठी शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. मात्र ते करण्याऐवजी राजकीय मोर्चे काढून केवळ शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप शिवसेना करते आहे.पीकविम्याचा प्रश्न गंभीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे, हे देखील वास्तव आहे. पण शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारमधील पक्षांनी यासंदर्भात शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे. केवळ मोर्चा काढून काहीही होणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अजूनही राज्यभरात पीककर्जाचे समाधानकारक वितरण झालेले नाही. काल-परवापर्यंत राज्यात जेमतेम २५ टक्के कर्जाचे वाटप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आजमितीस शेतकऱ्यांना पावसाची आणि पेरणीसाठी पतपुरवठ्याची गरज आहे. अशा ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी सवंग प्रसिद्धीसाठी राजकीय मोर्चे काढणाऱ्या सत्ताधारी पक्षांचा खरा चेहरा यानिमित्ताने शेतकऱ्यांसमोर आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले.