नवी मुंबई : स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. पालिकेस मोरबे धरण मिळवून देण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. परिसरातील डान्सबारचा उपद्रव लक्षात घेऊन डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. यामुळे त्यांच्या निधनाविषयी नवी मुंबई व पनवेलकरांनी दु:ख व्यक्त केले आहे. धरण विकत घेण्यासाठी प्रवृत्त केले ते तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनी. त्यांनी तत्कालीन महापौर संजीव नाईक व पक्षाचे नेते गणेश नाईक यांना धरण पालिकेसाठी फायदेशीर होईल असे सांगितले होते.नवी मुंबई-पनवेल परिसरात मोठ्याप्रमाणात डान्सबार सुरू होते. या परिसरातील व पश्चिम महाराष्ट्रातील तरुण डान्सबारमुळे व्यसनांच्या आहारी गेले होते. तत्कालीन शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी लक्षवेधी मांडली व आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. या दोन्ही निर्णयांमुळे या परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये आबांविषयी आदराचे स्थान निर्माण झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)नवी मुंबई महापालिकेस मोरबे धरण मिळवून देण्यात आबांचा सिंहाचा वाटा होता. तरुणांना प्रोत्साहन देणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. - संदीप नाईक, आमदार, ऐरोली
मोरबे धरण मिळवून देणारा नेता हरपला
By admin | Updated: February 17, 2015 00:16 IST