Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून आला रे!

By admin | Updated: June 9, 2017 06:49 IST

सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/पणजी : सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला. एक-दोन दिवसांत मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर मान्सूनधारा बरसतील, अशी खूशखबर हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा जरी मान्सून गोव्यात दाखल झाला असला तरी तीन दिवस जोरदार कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींनी गोव्यात पावसाळी वातावरण अगोदरच तयार झाले होते. बुधवारपर्यंत होन्नावर आणि दक्षिण कारवारपर्यंत पोहोचलेला मान्सून गतिमान झाल्यामुळे गुरुवारी तो गोव्यात आणि सिंधुदुर्गच्या काही भागांतही पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. मान्सून अत्यंत सक्रिय असून तीन-चार ठिकाणी जोरदार वृष्टी तर इतर ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम. एन. साहू यांनी सांगितले. गोव्याच्या अवकाशात आणि अरबी समुद्रावरही पावसाळी ढग जमा झाल्याची छायाचित्रे आल्तिनो-पणजी येथे उभारलेल्या डॉप्लर रडारद्वारे प्राप्त झाली आहेत. तसेच मान्सून बनण्यासाठीही अत्यंत पोषक वातावरण असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.सध्याची पूरक स्थिती लक्षात घेता मान्सून येत्या दोन दिवसांत कोकणातून मध्य महाराष्ट्रात सरकेल. याशिवाय कर्नाटकाचा अंतर्गत भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्रप्रदेश किनारपट्टी, मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर आणि त्रिपुरा, आसाम, मेघालयाचा उर्वरित भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती आहे़ >दिवसभरात गोव्यात पेडणे १२०, वसई १००, पणजी ९०, अलिबाग, मुरुड ७०, म्हसळा, वेंगुर्ला ६०, डहाणू, हर्णे, मार्मागोवा ५० तर देवगड, जव्हार, माथेरान, फोंडा, उरण येथे ४० मि.मी पावसाची नोंद झाली. याशिवाय मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. >माण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊससातारा : दुष्काळग्रस्त माण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. वावरहिरे, दानवलेवाडी, सोकासन डंगिरेवाडी, सुरुपखानवाडी, कारखेल, मलवडी या परिसरात गुरुवारीदेखील दमदार पाऊस झाला. जलयुक्तची कामे झालेल्या भागातच पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दोन दिवसांत राज्यभरातमान्सूनने गोव्यात प्रवेश करताना कोकणाच्या काही भागातही आगमन झाले आहे़ मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या अंतर्गत भागात त्याची वाटचाल होण्यासाठी एक-दोन दिवस वाट पाहावी लागेल़ - ए़ के. श्रीवास्तव, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, पुणे