Join us  

मुंबईत पावसाळी आजार बळावले; भाजपा आमदाराचं BMC आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 1:08 PM

शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती.

मुंबई - मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत पावसाळी आजार बळावले असून याबाबत उपायोजना करण्यात याव्यात अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून केली आहे. 

अमित साटम यांनी पत्रात म्हटलंय की, मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी, लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात १२ जुलैला लेप्टोचे पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे १२ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने १७ जुलैपर्यंत ११ रुग्णांची नोंद झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरूच असून जुलैमध्ये २४३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ३५० रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे मात्र शून्य रुग्ण नोंदले आहेत. स्वाईन फ्लूचाही प्रादुर्भाव पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या ३ वरून ११ वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यत राज्यात १५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :अमित साटमभाजपामुंबई महानगरपालिका