Join us  

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला, राज्यात मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:33 AM

केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.

मुंबई : केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. मात्र, त्याच वेळी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी नैर्ऋत्य मौसमी पावसाची वाटचाल पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागांत झाल्याने संपूर्ण देश नैर्ऋत्य मौसमी पावसाने व्यापला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.सांताक्रुझ वेधशाळेत शुक्रवारी कमाल तापमान ३६.२ अंश नोंदविण्यात आले आहे. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत हे कमाल तापमान ६ अंशांनी अधिक आहे. जुलै महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान असून २२ जुलै १९६० रोजी ३४.८ एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. ढगाळ सायंकाळ आणि वाढती आर्द्रता यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे.पावसाचा अंदाज : २० जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २१ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.२२ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२३ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.>पिके जगविण्यासाठी धडपड...हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येथील शेतकरी केशव नामदेव मुटकुळे यांनी दहा एकरात १६ बॅग कपासीच्या बियाण्याची लागवड केली. बियाण्यासाठी दहा हजारांचा खर्च झाला. रिमझीम पावसावर कपासी उगवली; मात्र गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. मुटकुळे हे दोन दिवसांपासून १० शेतमजूरांच्या सहाय्याने विहिरीतून शेंदून कपासीला तांब्याने पाणी टाकत आहेत. यासाठी दररोज दीड हजारांचा खर्च येत आहे. विहिरीतील पाणीही संपत आल्यामुळे पाच एकर कपासीलाच पाणी टाकले, आता विहिरीतील पाणी जनावरांसाठी ठेवल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकरी पिके जगविण्यासाठी पिकांना तांब्याने पाणी देत असल्याचे चित्र परिसरात सर्वत्र दिसून येत आहे. गतवर्षीचा दुष्काळ व यंदा सुरुवातीपासूनच पावसाने मारलेली दडी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

टॅग्स :मानसून स्पेशल