Join us

हार्बरवर मोनोचे ३ स्पॅन; ८५ टक्के काम पूर्ण

By admin | Updated: June 30, 2015 03:20 IST

एमएमआरडीएने मोनोच्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावरील वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याच्या कामाअंतर्गत हार्बर मार्गावरून तीन

मुंबई : एमएमआरडीएने मोनोच्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावरील वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याच्या कामाअंतर्गत हार्बर मार्गावरून तीन महत्त्वपूर्ण स्पॅन टाकण्याचे काम रविवारी पूर्ण केले असून, या कामानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.एमएमआरडीएचे सह-प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. प्राधिकरणाने रविवारी मुंबई पोर्ट ट्रस्ट यार्ड आणि वडाळ्यादरम्यान ३४.७४ मीटर, ४१.७४ मीटर व ४१.७४ मीटर इतक्या लांबीचे आणि ९.६ मीटर रुंदीचे तीन स्पॅन टाकले आहेत. या तीन स्पॅनचे एकूण वजन ७०० टन एवढे असून, तिन्ही स्पॅन टाकण्यासाठी प्राधिकरणाला तब्बल ४ तास ३२ मिनिटांचा कालावधी लागला.एवढ्या लांबीचे आणि वजनाचे स्पॅन्स टाकणे जिकिरीचे काम होते. मात्र ते मोठ्या कौशल्याने पार पाडण्यात आले. आता सर्व परवानग्या हाती असल्याने मोनो रेलचा दुसरा टप्पाही लवकरच पूर्ण होईल, अशी आशा कवठकर यांनी वर्तविली आहे. दरम्यान, चेंबूर ते वडाळा हा मोनो रेलचा पहिला टप्पा गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आला होता. परंतु प्रवाशांअभावी मोनो तोट्यात गेली. परिणामी, आता मोनोचा शहरातील दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा सेवेला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वास प्राधिकरणाला आहे. (प्रतिनिधी)