Join us

मातीवर डांबरीकरणाचा मुलामा

By admin | Updated: March 11, 2015 00:08 IST

शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदले आहेत. ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधीत ठेकेदाराची आहे

अंबरनाथ : शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदले आहेत. ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधीत ठेकेदाराची आहे. मात्र जे रस्ते खोदण्यात आले आहेत तेथे मातीवरच डांबरीकरणाचा मुलामा लावण्यात आला आहे. या निकृष्ट कामाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेने भुयारी गटार योजनेसाठी सव्वाशे कोटीचा ठेका इगल कंपनीला दिला असून शहरात कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी काम झाल्यावर ठेकेदाराने खोदलेले रस्ते दुरूस्त न करता मातीने भरले आहेत. वांद्रापाडा ते कैलाशनगर या रस्त्यावरील काम होऊन दोन महिने झाले. मात्र तरीही ठेकेदाराने तो दुरुस्त केलेला नाही. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालिकेचा एकही अधिकारी येथे नाही. त्यामुळे ठेकेदार आपल्याच मर्जीप्रमाणे काम करतांना दिसत आहे. पालिकेचे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याने ठेकेदाराच्या डांबरीकरणाच्या कामाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. ज्या रस्त्याचे काम सध्या सुरु आहे तो रस्ता काँक्रिटचा करण्याचे आदेश दिलेले आहे. शिवाय, या कामासाठी वापरत असलेल्या डांबराचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे.