Join us

तोतया पोलिसाकडून महिलांचा विनयभंग

By admin | Updated: February 27, 2015 01:40 IST

पोलीस असल्याचे भासवून महिलेचा विनयभंग करणा-या तोतयाला गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटने बेड्या ठोकल्या. रवी वर्मा(३९) असे या आरोपीचे नाव असून तो नवीमुंबईच्या खारघर परिसरातला इस्टेट एजंट आहे

मुंबई : पोलीस असल्याचे भासवून महिलेचा विनयभंग करणा-या तोतयाला गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटने बेड्या ठोकल्या. रवी वर्मा(३९) असे या आरोपीचे नाव असून तो नवीमुंबईच्या खारघर परिसरातला इस्टेट एजंट आहे. वर्माने अनेक महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीतून समोर आली आहे. विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला १५ दिवसांपूर्वी वर्माने फोन केला. त्याने स्वत:ची ओळख पुणे गुन्हे शाखेचा अधिकारी, अशी करून दिली. तुमच्या पतीविरोधात सेक्स स्कँडलचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. यासंदर्भात भेटायचे असेल तर वाशी येथे या, असे वर्माने सांगितले. दुसऱ्याच दिवशी ही महिला वर्माला भेटण्यासाठी गेली. तेव्हा वर्माने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेतल्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. घटना घडली तेव्हा वर्माची ओळख उघड झाली नव्हती. तक्रारदार महिला त्याला पोलीस अधिकारीच समजत होती. त्यामुळे विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हा गंभीर असल्याने अंधेरी युनीटने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ निरिक्षक दीपक फंटागरे आणि पथकाने अशीच पद्धत असलेल्या गुन्हयांची माहिती गोळा केली. त्यात अटक झालेल्या आरोपींची माहिती घेतली. दुसरीकडे तांत्रिक तपास सुरू केला. यातून वर्माची ओळख पटली. तो गुरुवारी खारघर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास पथकाने सापळा रचून वर्माला अटक केली. चौकशीत त्याने यापूर्वी अशाच प्रकारे दिल्ली, नवीमुंबई आणि मुंबईत १४ महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)