Join us  

महिला उमेदवाराचा मुलुंडच्या भाजपा पदाधिकाऱ्याकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:20 AM

नगरसेवक निवडणुकीदरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत भारतीय जनता पक्षाच्या मुलुंड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक तरेने महिला उमेदवाराचा विनयभंग केल्याची घटना मुलुंडमध्ये बुधवारी घडली. या प्रकरणी तरेला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई : नगरसेवक निवडणुकीदरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत भारतीय जनता पक्षाच्या मुलुंड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक तरेने महिला उमेदवाराचा विनयभंग केल्याची घटना मुलुंडमध्ये बुधवारी घडली. या प्रकरणी तरेला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.तक्रारदार महिला मुलुंड पश्चिमेकडील उच्चभ्रू वसाहतीत राहते. नगरसेवक निवडणुकीदरम्यान त्या १०५ मधून उमेदवार होत्या. त्याचदरम्यान त्यांची तरेसोबत ओळख झाली. निवडणुकीनंतर त्यांनी तरेसोबत संवाद साधणे बंद केले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता मुलीला कालिदासमध्ये प्रशिक्षणासाठी सोडले. तेथून घरी जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. तेव्हा त्यांच्या मागावर असलेला तरेही रिक्षात बसला. त्याने महिलेला बोलत का नाही, याचा जाब विचारला. तेव्हा सध्या काही राजकीय काम नसल्यामुळे संवादाची गरज नसल्याचे तिने सांगितले. मात्र तरीही तो त्यांना बोलण्यासाठी जबरदस्ती करत होता. रिक्षाने तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. रिक्षातून उतरताच तरेने त्यांचा हात पकडून त्यांना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला ढकलून थेट घर गाठले. त्यानंतर रात्री उशिराने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी तरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.

टॅग्स :गुन्हा