मोखाडा ग्रामीण : वनविभागाच्या संपाचा फायदा उचलत चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अहमदनगरहून खोडाळा-मोखाडा मार्गे सेल्वासाकडे पिकअप गाडीमध्ये सुमारे दोन लाख तीस हजार रु. च्या चंदनाची तस्करी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला मोखाडा पोलिसांनी सापळा रचून खोडाळ्याच्या चौकातच पकडले आहे. त्यांच्यावर वनअधिनियमांतर्गत चंदनाच्या तस्करीचा गुन्हा मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरहून खोडाळा-मोखाडामार्गे गुजरात राज्याकडे जाणाऱ्या एका पिकअप गाडीमधून चंदनाची तस्करी केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार खोडाळा येथील चौफुलीवर सापळा रचण्यात आला. खबरीनुसार गाडी खोडाळ्याच्या चौकात येताच गाडी अडवून तिची तपासणी केल्यावर गाडीत २३० किलो चंदन आढळून आले आहे. बाजारात या चंदनाची किंमत २ लाख ३० हजार रू. इतकी आहे. या पिकअप गाडीच्या चालकासह अन्य दोघांना मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मात्र या चंदनतस्करांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीला मोखाडा पोलिसांनी पकडले
By admin | Updated: September 1, 2014 04:58 IST