मुंबई :शहरामध्ये जागोजागी रस्त्यावर मोकाट श्वानांनी उच्छाद माजवला आहे. बाईकस्वार तसेच पादचारी यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांमुळे वाहतूक व्यवस्था अडचणीत आली आहे.पालिकेने अजूनही कारवाई केलेली नसताना मोकाट श्वानांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने श्वान रस्त्याच्या मधोमध येत असल्या कारणामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.
मोकाट श्वानांचा वाली कोण ?
रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट कुत्री फिरत असल्याकारणामुळे यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका अजूनही कारवाई करत नसताना मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कुत्र्याचं व्यवस्थापन कशा रीतीने होणार हा प्रश्न समोर आहे.
काय म्हणतात स्वयंसेवी संस्था ?
नमो नमः संस्थेचे विक्रम कांबळे म्हणाले की, मुंबईमध्ये सगळीकडे रस्त्यावर श्वान फिरताना दिसत आहेत.पालिकेला याबाबतीत सांगून देखील यावर अजून कोणतीही कारवाई झालेले नाही. मोकाट श्वानांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच त्यांची नसबंदी करणं देखील आवश्यक आहे. ज्या जागेमध्ये कुत्र्यांचे व्यवस्थापन झाले आहे तिथे देखील श्वानांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासंबंधी आम्ही पालिकेशी चर्चा करत आहोत; मात्र पालिका अजून कारवाई करत नाही.
* नागरिक हवालदिल
मोकाट श्वानांपासून नागरिक चिंतेत आहेत. तसेच मोकाट श्वानांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोरिवली भागामध्ये रस्त्यारस्त्यावर गल्लीमध्ये भटक्या कुत्र्याचं वास्तव्य आहे त्यामुळे लोक रात्री बाहेर पडण्यास धास्तावत आहेत. श्वान चावण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत.
* रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
शहरामध्ये रस्त्यारस्त्यावर महापालिकेने कचराकुंड्या ठेवल्या आहेत; मात्र कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर फेकला जातो या कारणास्तव या कचऱ्यामध्ये अन्नाच्या शोधत मोकाट श्वान येत असतात.