रोहा : रोहे तालुक्यात सध्या मोकाट गुरे चोरणाऱ्या टोळीने हैदोस घातला आहे. रोेहे अष्टमी येथील तीन शेतकऱ्यांच्या १० गाई व म्हैस चोरुन नेण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी अज्ञात चोरटे रात्री अपरात्रीचा फायदा घेत गुुरे चोरुन ते मुंबईत कमी भावात विकत असल्याची माहिती समजली आहे. या मुक्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी टेम्पोचा वापर केला जात असून शहर व तालुक्यात ६ ते ८ जणांची गुरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याने शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.अष्टमी मराठा आळीतील समाज अध्यक्ष रमेश गोवर्धने, वरचा मोहल्ला येथील फराज नाडकर, कोळीवाड्यातील नितीन सदावर्ते या तिघांच्या सुमारे १ लाख रुपये किमतीच्या एकूण १० गाई व म्हैस कुणी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या गावात शोध घेतला असता गुरे कुठेही दिसून आली नाहीत. ही गुरे चोरट्यांनीच चोरुन नेली असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून रोहे शहरात व ग्रामीण भागात मोकाट गुरे वावरत असल्याने वाहतूक करणाऱ्या वाहनांना व पायपीट करणाऱ्या व्यक्तींनी विशेषत: महिला व विद्यार्थी वर्गाला जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे.
मोकाट गुरे चोरणारी टोळी कार्यरत
By admin | Updated: September 24, 2014 23:22 IST