Join us

उमटली लोक‘शाई’ची मोहोर !

By admin | Updated: October 16, 2014 01:20 IST

हिंदमाता परिसरात राहणाऱ्या १०१ वर्षांच्या गोपिकाबाई राजाराम दुखंडे यांनी तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात मतदानाचा हक्क बजावला

मुंबईत विधानसभेच्या मतदानासाठीचा दिवस मतदारराजाने गाजवला. सर्व स्तरातील मतदारांनी मतदानाचे कर्तव्य बजावले. दिवसभर सर्वच मतदान केंद्रांवर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्त्याची लगबग सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहायला मिळाली. मुंबईची खास ओळख असलेल्या सेलीब्रिटींनीही मतदानासाठी आवर्जून हजेरी लावली होती. सेलीब्रिटींचे मतदानही आजचा चर्चेचा विषय ठरला. सोशल नेटवर्किंगवर तर मतदानासाठीच्या आवाहनांचा आणि सेल्फींचा अक्षरश: पाऊस पडला. गेला जवळपास महिनाभर प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. अनेक स्तरांवरून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत होते. याला प्रतिसाद देत मुंबईतील मतदारांनी रांगा लावून मतदान केले आणि उमेदवारांच्या भवितव्यावर लोक‘शाई’ची मोहोर उमटवली!गोपिकाबार्इंचे राज फेव्हरेटहिंदमाता परिसरात राहणाऱ्या १०१ वर्षांच्या गोपिकाबाई राजाराम दुखंडे यांनी तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. महापालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो प्रत्येक निवडणुकीत त्या याच उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतात. मी एकदाही मतदान चुकवलेले नाही, अशी प्रतिक्रिया बोटावरील शाई दाखवत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. नातू कृष्णकांत त्यांच्यासोबत होते. आजीला प्रत्येक लढतीत कोणते उमेदवार रिंगणात आहेत याची इत्थंभूत माहिती असते. या वेळी वडाळ्यातून कोण कोण लढते आहे हे आजीला माहीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत आजीला आदर होता. मात्र आता राज तिचे फेव्हरेट आहेत, कृष्णकांत सांगत होते.