कर्जत : मोहाचीवाडीतील दुर्घटनेने नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने धसका घेऊन तत्काळ नेरळ मोहाचीवाडी परिसरातील पावसाळ्यात धोकादायक असलेल्या दहा घरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही लगेच करण्यात आली. नेरळ ग्रामपंचायतीने कर्जत महसूल कार्यालयाला मदत करीत मोहाचीवाडी भागातील खाजगी खोल्या भाड्याने घेऊन स्थलांतरित केलेल्या कुटुंबाला उपलब्ध करून दिल्या आहेत. मोहाचीवाडी येथील सोहल मुन्ना शेख, सलीम मोहमद खान, नदीम मोहमद खान, रमेश धर्मा चव्हाण, सुशीला रामचंद्र गायकवाड, शकुंतला मुन्शीलाल गुप्ता, जग्बहादूर रामलखन यादव, मोहमद आली शेख, अछेलाल मेबलाल गुप्ता, अल्ताफ इमाम शेख अशा १० जणांची कुटुंबे हलविली आहेत. सोमवारी भिंत खचल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील किसन राघो दिघे (५०), सुनंदा दिघे (४५), अर्चना दिघे (२०), स्वप्नेश दिघे (१९), जाईबाई कदम (६५) या पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना तत्काळ २० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश लाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे आदींनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)
मोहाचीवाडीत दहा कुटुंबे स्थलांतरित
By admin | Updated: June 23, 2015 23:20 IST