ठाणे : सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ठाण्याऐवजी नवी मुंबईतील पटनी येथे घ्यावी अशी सुचना ठाणे पोलिसांनी भाजपाला केली होती. परंतु पटनी येथील मैदान भव्य असल्याने तेथे गर्दी जमविण्यात कार्यकर्त्यांची दमछाक होऊ शकते अशी दाट शक्यता भाजपाच्या वरीष्ठ गटात निर्माण झाल्याने अखेर मोदी यांची सभा ठाण्यातील सेंट्रल मैदानात घेण्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.१२ आॅक्टोबर रोजी सांयकाळी सहा वाजता ही सभा घेण्यात येणार आहे. यासाठी सुरक्षेच्या यंत्रणाची धावपळ सुरु झाली आहे. मोदी यांची सभा सेंट्रल मैदानातच व्हावी अशी इच्छा ठाण्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी हे मैदान मिळावे म्हणून सुरवातीपासून हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु त्यांची तारीख निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते देखील संभ्रमात होते. त्यात ठाण्यातील चार ठिकाणी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये ठाणे शहर मतदारसंघातील संजय केळकर सोडले तर कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातील संदीप लेले, कळवा- मुंब्रा मतदारसंघातील अशोक भोईर आणि ओवळा - माजिवडा मतदारसंघातील संजय पांडे हे तितक्या ताकदीचे उमेदवार नाहीत. त्यामुळे मोदींच्या भाषणाचा करीष्मा आपल्याला ठाण्यात तारु शकतो अशी आशा या उमेदवारांना असल्याची माहिती भाजपाच्या सुत्रांनी दिली. त्यात ठाणे शहर हा मतदारसंघ काही काळापूर्वी भाजपाकडेच होता. कालांतराने, भाजपाने हा मतदारसंघ शिवसेनेला दिला. त्यानंतर लोकसभा निवडणुक पार पाडल्यानंतर भाजपाने पुन्हा ठाणे शहर मतदारसंघावर दावा केला होता. परंतु ज्या इच्छुकाने येथे दावा केला होता. त्याचाच पत्ता येथून कट झाला आहे. असे असेल तरी शिवसेना आणि भाजपामध्ये फुट पडल्याने आता हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने हालचाली सुरु केल्या आहे. हा मतदारसंघ काबीज केल्यास पुढील महापालिका निवडणुकीचीही चित्रे भाजपा पालटवू शकणार आहे. त्यामुळेच येथे केळकरांना संधी देत, भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
मोदींची सभा पटनीऐवजी ठाण्यातच
By admin | Updated: October 10, 2014 00:02 IST