Join us

कल्याण पश्चिमेत मोदींचा करिष्मा कायम

By admin | Updated: October 22, 2014 22:50 IST

लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी तब्बल ९७ हजारांचे मताधिक्य मिळविले होते.

प्रशांत माने, कल्याणलोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी तब्बल ९७ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. त्या वेळेस झालेल्या मतदानाचा ‘मोदी’करिष्मा पुन्हा विधानसभा निवडणुकीतही उमटल्याने याचा लाभ भाजपाच्या नरेंद्र पवारांना झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा या मतदारसंघात कायम असल्याचे दिसून आले असले तरी अन्य राजकीय पक्षांतील ‘अंतर्गत कुरबुरी’ही त्या पक्षांच्या उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा ५ हजारांचे मताधिक्य मिळवून मनसेचे प्रकाश भोईर यांनी पराभव केला होता. त्या वेळेसही पक्षांतर्गत असलेली कुरबूर देवळेकरांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. यंदाच्या निवडणुकीतही विजय साळवी यांना उमेदवारी देण्यावरून काही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यात नगरसेवक अरविंद मोरे यांनी तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली होती. कालांतराने त्यांचे बंड थोपविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी काहींनी आपली नाराजी कायम ठेवल्याचे दिसून आले. याचबरोबर शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांचे खंदे समर्थक व कोळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना ३ हजार ३८४ मते मिळविली आहेत. ही मते शिवसेनेची पारंपरिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे एक प्रकारे ही मतेदेखील साळवी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची शक्यता आहे.