Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र मोदी लाट

By admin | Updated: May 17, 2014 01:53 IST

जसेजसे मतमोजणीचे निकाल स्पष्ट होऊ लागले तशीतशी महायुतीच्या कार्यकर्त्यांत, कार्यालयात आणि मतमोजणी केंद्र परिसरात मोदी लाटीचा प्रत्यय येऊ लागला.

ठाणे : जसेजसे मतमोजणीचे निकाल स्पष्ट होऊ लागले तशीतशी महायुतीच्या कार्यकर्त्यांत, कार्यालयात आणि मतमोजणी केंद्र परिसरात मोदी लाटीचा प्रत्यय येऊ लागला. आजच्या मतमोजणीचा कौल कसा असेल याचा अंदाज आल्यामुळे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आठवले गट) यांच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. या तीन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी आणि वाहनांना पक्षाचे झेंडे लावले होते. या तीन्ही पक्षांच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची दाटी होती. मतमोजणीचे प्रारंभिक कौल येताच फटाक्यांच्या माळा आणि लाडू, पेढे, बर्फी यांचाी खोकी आणून ठेवली तर काही उत्साही मंडळींनी लगेच आपापल्या विजयी उमेदवारांचे फ्लेक्सही करायला टाकले. काही उत्साही मंडळींनी ढोल, ताशे, बॅन्जो, बॅण्डची पथकेही मागवून ठेवली. उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात विजयी उमेदवाराच्या अभिनंदनासाठी हार, मिठाई, ढोलपथके आणि गुलालाच्या पाच-पाच किलोच्या पिशव्यांसह धाव घेतली. विशेष म्हणजे रिपाइ कार्यकर्त्यांनी निळा रंगही सोबत घेतला होता. ‘अब की बार मोदी सरकार’, ‘देश का पीएम कौन बनेगा, गुजरात का शेर मोदी बनेगा’, अशा घोषणाही दिल्या जात होत्या. सेना-भाजपा आणि रिपाइंच्या काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक फलकांवर मतमोजणीचे आकडे लिहून जनतेची सोय साधण्याचा प्रयत्न केला, तर काही पक्ष कार्यालयातील टीव्ही बाहेर आणून ठेवले होते. पानाचा ठेला असो की चहाची गाडी आणि लोकल असो की सीटी बस सगळ्यांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रचंड उत्सुकता होती. याच्या नेमके उलट वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यालयात होते. मोजकेच चेहरे चिंतातूर मुद्रेने काय झाले, कसे झाले, कशामुळे झाले, आता काय होणार याची चर्चा दबक्या सुरात करीत होते. तर काही ठिकाणी कुणाच्या दगाफटक्यामुळे हे घडून आले याचीही खलबते सुरू होती. जिल्ह्यातील चारपैकी किमान दोन जागा तरी आघाडीला मिळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ठाणे, कल्याण येथे विद्यमान खासदार विजयी होतील. पालघरची जागा मित्रपक्ष असलेल्या बविआला मिळेल, असा आघाडीचा अंदाज होता. परंतु यापैकी काहीच घडून न आल्याने आता विधानसभा निवडणुकीत काय होणार याची आणि पक्षसंघटनेतील कोणते पदाधिकारी राहणार व कोणते जाणार याचीही चर्चा दबक्या स्वरात सुरू होती. कार्यकर्त्यांचे फोन सतत खणखणत होते.