रत्नागिरी : भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेसमोर ‘अच्छे दिन’चे वातावरण तयार केले. मात्र, केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य लोकांवर ‘बुरे दिन’ आणले आहेत. हाच मुद्दा घेऊन आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ. काँग्रेसचा प्रचार समिती प्रमुख म्हणून हीच भूमिका घेत विरोधकांना जेरीस आणण्यावर आपला भर असेल, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.रत्नागिरी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष रमेश कीर उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. मोदी आणि भाजप यांनी अनेक आश्वासने दिली आणि लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, केंद्रात मोदी यांचे सरकार विराजमान झाल्यानंतर रेल्वे तिकीट दर, पेट्रोल, डिझेल, भाज्या या सर्वच क्षेत्रांत महागाई झाली आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेवर ‘बुरे दिन’ आले आहेत. हीच बाब आता विधानसभा निवडणुकीत आपण लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. थापा मारणाऱ्यांना मत देऊ नका, हेच लोकांना आम्ही पटवून देऊ, असे ते म्हणाले. गुजरातपेक्षा महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत कसा पुढे हेही आपण लोकांसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारने केलेली फसवणूक लक्षात आल्यामुळे राज्यातील सत्ता टिकेल. कोकणात परिवर्तन होईल आणि कोकणातील जागा वाढतील, असा दावाही त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जागांसाठी आग्रही असल्याने आघाडी होईल की नाही, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिल्ली यांच्याशी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेच चर्चा करतील, असे ठरले आहे.मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर अनेक समाजांनी आरक्षणाविषयीच्या अनेक मागण्या समोर ठेवल्या आहेत. त्या सर्व मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे ते म्हणाले. इको सेन्सिटीव्हच्या मुद्द्यावर त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. या खासदारांनी आधी अभ्यास करावा आणि मग बोलावे, असे ते म्हणाले. इको सेन्सिटीव्ह झोनमधून एकही गाव वगळण्यात आलेले नाही. ही माहिती न घेताच राऊत वाट्टेल तशी विधाने करत आहेत. मुळात शिवसेनेची भूमिकाच दुतोंडी आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांची तशीच भूमिका आहे. शिवसेनेला स्वत:चे अस्तित्व राहिलेले नाही. ते भाजपचे शेपूट धरून पुढे जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
मोदींनी अच्छे नहीं, ‘बुरे दिन’ आणले
By admin | Updated: August 15, 2014 00:21 IST