Join us

आरेसाठी मोदी, बिग बींना साकडे

By admin | Updated: March 25, 2015 00:54 IST

‘सेव्ह आरे’ संस्थेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, गायक हरिहरन यांना साकडे घातले आहे. या माध्यमातून ‘राखीज् फ्रॉम आरे’ या नावाने दिग्गजांना राखी पाठविली आहे.

मुंबई : मुंबईकरांचा श्वास असणाऱ्या हिरवाईची कत्तल करण्याच्या विरोधात मुंबईकरांनी ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू केली असून, त्यासाठी आता ‘सेव्ह आरे’ संस्थेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, गायक हरिहरन यांना साकडे घातले आहे. या माध्यमातून ‘राखीज् फ्रॉम आरे’ या नावाने दिग्गजांना राखी पाठविली आहे.नव्या नगर नियोजन आराखड्यानुसार आरे कॉलनीमधील वनराईची कत्तल करून तिथे न्यूयॉर्क शहराच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारण्याची धडपड अमान्य करीत ‘आरे वाचवा’चा नारा बुलंद झाला आहे. हे पत्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे. या प्रत्येक राखीसोबत एक पत्र पाठविले जात आहे, ज्यात ‘झाड’ स्वत: बोलत आहे. आपल्या बचावासाठी स्वत: झाड साद घालत आहे अशी अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. राखी म्हणजे रक्षणाचे प्रतीक, भाऊ आपल्या बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. तसेच या सर्वांनी आरेमधील वृक्षांना वाचवण्याचे वचन द्यावे अशी अपेक्षा आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे २ हजार ३०० राख्या पाठविण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. झाडांना आपल्या बचावासाठी काहीच करता येत नाही. झाडे बोलू शकत नाहीत. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी झटपट प्रयत्न करता येत नाहीत. यासाठीच ‘सेव्ह आरे’चे वृक्षप्रेमी त्यांच्या भावना राखीमार्फत पोहोचविणार आहेत. ही राखी इकोफ्रेंडली असून, ती तयार करण्यासाठी झाडांखालील सुकलेला पाला-पाचोळा, बिया इ.चा वापर करण्यात आला आहे. राखी तयार करण्याची ही हटके संकल्पना कला क्षेत्रातील नवोदित पिढीच्या प्रशांत कालीपुरियात, विक्रम ढेंबरे, शिवम् इंगळे, आहाना चौधरी, वरुण सिन्हा यांनी सत्यात उतरवली आहे. या प्रयत्नातून प्रत्येक मुंबईकराला ‘झाडे वाचवा’ हा संदेश देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)