Join us

नैराश्यातून मॉडेलची आत्महत्या

By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST

नैराश्यातून मॉडेलची आत्महत्या

नैराश्यातून मॉडेलची आत्महत्या
मुंबई: वर्सोवा येथील म्हाडा कॉलनीत एका मॉडेलने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्चना पांडे (२६) असे मृत मॉडेलचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र असलेल्या आसिफ पठाण याला अटक केली आहे.
मॉडेल अर्चना ही वर्सोवा येथील न्यू म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक सहाच्या बारा मजल्यावर एकटी राहत होती. सोमवारी सकाळी तिच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजार्‍यांनी पोलिसांना दिली. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर अर्चनाचा कुजलेला मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविला आहे. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ती नैराश्याने ग्रासली होती तसेच तिची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याचे तिने नमूद केले होते. याकरिता तिने आपल्या मित्रच कारणीभूत असल्याचे लिहिले होते. तिच्या आई वडिलांचे निधन झाले असून गुजरात पोलिसांनी तिच्या भावाला आर्थिक गुन्ह्याप्रकरणी अटक केली होती.अर्चना सध्या मिर्झा प्रॉडक्शन या कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होती. तिने एका कॅलेंडरकरिता मॉडेलिंग केले होते. तसेच काही दक्षिणेच्या अल्बममध्येही काम केले होते.
(प्रतिनिधी)