Join us  

मोबाइल क्रमांक मागणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:20 AM

पती-पत्नीला बेड्या : टिळकनगरमधील घटना

मुंबई : पत्नीकडे मोबाइल क्रमांक मागितला म्हणून ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना टिळकनगरमध्ये सोमवारी रात्री घडली. या गुन्ह्यात पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. यशवंत झाडे (४०) आणि पत्नी वीणा झाडे (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.झाडे दाम्पत्य टिळकनगर परिसरात वास्तव्यास आहे. यशवंत झाडे गावी असताना, त्याच परिसरातील राकेश शिंदे (३५) त्यांच्या पत्नीकडे मोबाइल क्रमांक मागत होता. पत्नी वीणा यांनी त्याला बजावूनदेखील तो मोबाइल क्रमांक देण्यासाठी हट्ट करत होता. यशवंत हे गावावरून घरी परतल्यानंतर पत्नीने सर्व प्रकार त्यांना सांगितला. याच रागात सोमवारी सकाळी ८च्या सुमारास झाडे याने शिंदेच्या घरी धाव घेतली. शिंदेला बेदम मारहाण करून, पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला देत तो घरी निघून आला.रात्री ११च्या सुमारास शिंदेने झाडेचे घर गाठून मारहाण का केली, याचा जाब विचारला. तेव्हा झाडेने त्याला आणखी मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. ही बाब शिंदेची पत्नी मनीषा हिला समजताच तिने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची वर्दी मिळताच टिळकनगर पोलीस तेथे दाखल झाले. पत्नी मनीषा शिंदेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी झाडे दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर, मंगळवारी पहाटे याच गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही २५ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती, टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली.

टॅग्स :खूनगुन्हा