Join us

मनसेची पालिकेतील पाटी झाली कोरी, एकमेव माजी नगरसेवकही गेला शिंदे शिवसेनेत

By जयंत होवाळ | Updated: June 8, 2025 09:51 IST

Sanjay Turde News: मुंबई महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जेमतेम सात नगरसेवक निवडून  आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तेही नगरसेवक टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. सात पैकी सहा नगरसेवकांना उद्धवसेनेने गळाला लावले होते.  नगरसेवक संजय तुरडे यांनी मात्र पालिकेचा कार्यकाळ संपला तरी मनसेची साथ सोडली नव्हती.

- जयंत होवाळ मुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जेमतेम सात नगरसेवक निवडून  आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तेही नगरसेवक टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. सात पैकी सहा नगरसेवकांना उद्धवसेनेने गळाला लावले होते.  नगरसेवक संजय तुरडे यांनी मात्र पालिकेचा कार्यकाळ संपला तरी मनसेची साथ सोडली नव्हती.  मात्र आता त्यांनीही मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उद्या, सोमवारी ते शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. तुरडे कुर्ला वॉर्ड १६६ मधून निवडून आले होते.

२०१२ सालच्या निवडणुकीत मनसेचे २८  नगरसेवक निवडून आले होते. २०१७ साली हा आकडा सातवर  आला.  निवडणूक झाल्यानंतरही मनसेच्या मागची साडेसाती कायम राहिली. सातपैकी सहा नगरसेवकांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. फक्त तुरडे यांनी पक्ष  सोडला नव्हता. त्यांनीही पक्ष सोडल्यामुळे मनसेची पाटी कोरी झाली आहे. उद्धवसेनेने  मनसेचे नगरसेवक खेचले खरे;  पण मागील काही महिन्यांत त्यांच्याही पक्षाला  खिंडार पडले आहे. २०१७ आणि त्यापूर्वीच्या निवडणुकांमधील असे मिळून सुमारे ६० माजी नगरसेवकांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. त्यात अनेक मातब्बर नगरसेवकांचा समावेश आहे.

निधी नाही म्हणून : तुरडे पालिकेचा कार्यकाळ संपल्यापासून आम्हाला वॉर्डात  विकासकामे करण्यासाठी निधी मिळत नव्हता. अशा परिस्थितीत कामे कशी करणार? मतदारांच्या प्रश्नांना आम्हालाच सामोरे जावे लागते. निधीअभावी कामे रखडतात.  मग आगामी निवडणुकीत  जनतेसमोर कसे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय  घेतला आहे, असे तुरडे म्हणाले. मात्र दोन वर्षे थांबलात, आता चार महिन्यांत निवडणूक होईल, मग एवढी घाई का, असा   प्रश्न त्यांना केला असता, चार महिने निधी नसताना काम कसे करू आणि मग निवडणुकीत लोकांना काय काम दाखवू, असा सवाल त्यांनी केला. निधी मिळाल्याने या चार महिन्यांत वॉर्डातील प्रलंबित  कामे तरी मार्गी लावता येतील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिवसेना