Join us  

मनसेचे नेतेही घेतात हप्ते, संजय निरूपम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:44 AM

फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपा आणि मनसेवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

मुंबई : फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपा आणि मनसेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. हप्तेबाजी सुरू राहावी, यासाठी फेरीवाल्यांना नियमित केले जात नाही. मनसेचेही काही नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप निरूपम यांनी केला.फेरीवाल्यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्यास काहीही चुकीचे नसल्याचे सांगत निरूपम म्हणाले की, फेरीवाले जिथे कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र, जिथे फेरीवाले मजबूत असतील तर तिथे मनसेला मार खावाच लागेल. मनसेचे कार्यकर्ते गेले अनेक दिवस मुंबई आणि उपनगरात मारहाण करतात; परंतु गुन्हा दाखल होत नाही. मनसे अध्यक्ष परवानगीशिवाय मोर्चा काढतात, तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही; पण मी फेरीवाल्यांसोबत बैठक घेतली, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप निरूपम यांनी केला.फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. मुख्यमंत्री आणि आयुक्तांना कोण रोखत आहे. कोणाला अवैध फेरीवाले बंदच करायचे नाहीत. त्यांना हा धंदा सुरूच राहावा असे वाटते. या फेरीवाल्यांकडून अनेक पक्षातील नेते हप्ता घेतात. मनेसेचेही काही नेते हप्ता घेतात. त्यांची नावे मी लवकरच सांगणार आहे, असेही ते म्हणाले.संजय निरूपम यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनाही टोला लगावला. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. तसेही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :इंडियन नॅशनल काँग्रेसमनसे