Join us  

'...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही', राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिला धोक्याचा इशारा

By ravalnath.patil | Published: October 07, 2020 3:42 PM

Raj Thackeray : मूर्तीकारांना राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला देत एक धोक्याची सूचनाही दिली आहे.

मुंबई :  केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तीकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या मूर्तीकारांना राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला देत एक धोक्याची सूचनाही दिली आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते पटकन विरघळत नाही. विसर्जनानंतर तुम्ही जर कोणत्याही चौपाट्या बघितल्या तर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असते. त्यामुळे तुम्ही वेगळा विचार करून बघा. जर उद्या परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकणार नाही, असा धोक्याचा इशारा राज ठाकरे यांनी मूर्तीकारांना दिला आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण आतापर्यंत केल्या आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही समोर आले आहेत. त्यावर तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. समुद्रात किंवा नदीत त्याचे विघटन लवकर होईल. तुमचे कामही सोयीचे होईल. अशावेळी जेवढ्या जमेल तेवढ्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणे हे जास्त संयुक्तिक असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विरघळण्यास आठ दिवस जातात. त्यामुळे तुम्ही मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने वेगळा काही मार्ग निघतो का, यावर विचार करा. मी सुद्धा समुद्रात विसर्जनासाठी याचा काही वेगळा पर्याय होतील का, यासंदर्भात सरकारमधील कोणी व्यक्ती असेल त्याच्याशी चर्चा करतो, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी मूर्तीकारांना दिले.

दरम्यान, मनसेकडे सत्ता नसतानाही कोरोना संकट काळात आपले विविध प्रश्न घेऊन आतापर्यंत अनेक संघटनेच्या लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

या भेटीत लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या होत्या. तसेच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे व प्रसंगी आंदोलन करण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले होते. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबई