Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:06 IST

मुंबई - मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची भेट घेत ...

मुंबई - मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

पालिकेच्या वतीने ज्या निविदा काढण्यात येतात त्यात प्रामुख्याने बेरोजगार संस्था, सहकारी संस्था, सेवा संस्था आणि महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच पालिका ही सार्वजनिक मंडळे आणि स्वयंसेवी संस्था यांनासुद्धा निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेते. मात्र रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांच्या अधिकार कक्षेत येत नाही. त्यांच्याकडे त्या कामाचा कोणताही अनुभव नसल्याने महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत वस्तीमधील साफसफाईचा मूळ उद्देश साध्य होत नाही, याकडे शालिनी ठाकरे यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.

स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत निविदा मिळाल्यानंतर महिला बचत गट आणि सेवा संस्था यांना ईपीएफ आणि पीएफ भरण्यासाठी सांगितले जात असून, याबाबतीत त्यांना महानगरपालिकेच्या वतीने कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. सोबतच सदर योजनेत काम करणारे हे कंत्राटी कामगार नाहीत. ते स्वयंसेवक असल्याने त्यांना पीएफ आणि ईपीएफ ही अटच लागू होत नाही. याबाबतीत अनेक सेवा संस्था आणि बचत गट यांना ईपीएफ आणि पीएफ ऑफिस कडून नोटीस आल्या असून, महानगरपालिकेच्या वतीने याबाबतीत एक परिपत्रक काढून संबंधित कार्यालयाला कळवावे, अशी मागणी त्यांनी केली.

आपण मांडलेले मुद्दे योग्य असून याबतीत महानगरपालिका प्रशासन नक्कीच कार्यवाही करेल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात सहकार सेनेचे सरचिटणीस विजय जाधव, सहकार सेनेचे सचिव वल्लभ आणि विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.