Join us  

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 5:48 PM

राजकीय वर्तुळात दोन ठाकरेंच्या भेटीची चर्चा

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे 27 जानेवारीला विवाहबद्ध होणार आहेत. याच विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सत्तेत राहून कायम विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा राज ठाकरेंनी त्यांच्या अनेक व्यंगचित्रांमधून समाचार घेतला आहे. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अमित ठाकरे 27 जानेवारीला मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी राज मातोश्रीवर पोहोचले आहेत. या भेटीत काही राजकीय चर्चा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जवळपास दोन वर्षांपासून अधिक काळ राज ठाकरे मातोश्रीवर गेले नव्हते. याआधी 29 जुलै 2016 रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतली होती. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाल्यानंतर राज यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याआधी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यानंतर राज यांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं होतं. त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवला होता.