Join us

श्वान पथकाच्या प्रमुखाकडून महिला हॅण्डलर्सचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 06:27 IST

मुंबई पोलीस दलाच्या श्वान पथकात पहिल्यांदाच दाखल झालेल्या महिला हॅण्डलर्सपैकी एकीवर श्वान प्रमुखाच्या अश्लील वर्तनामुळे पोलीस ठाणे गाठण्याची वेळ ओढावल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या श्वान पथकात पहिल्यांदाच दाखल झालेल्या महिला हॅण्डलर्सपैकी एकीवर श्वान प्रमुखाच्या अश्लील वर्तनामुळे पोलीस ठाणे गाठण्याची वेळ ओढावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत, प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद श्रीपती बल्लाळ (३८) याला सोमवारी बेड्या ठोकल्या.भारतीय लष्कर, एनएसजीप्रमाणे मुंबई पोलीस आपल्या ताफ्यात १० बेल्जियन शेफर्ड प्रजातीचे श्वान सामील करणार आहेत. त्यापैकी पाच श्वान दाखल झाले आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला हॅण्डलर्सची नियुक्ती झाली. पाच जणी या पाच श्वानांची देखरेख करीत होत्या.महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीनुसार, बल्लाळ हा प्रभारी असल्याने, त्याने पदाचा गैरवापर करत, फेब्रुवारीपासून विविध बहाण्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याचे अश्लील वर्तन वाढले. त्यातच कुठे आहेस, असे विचारत पाठलाग करणे सुरू झाल्याने अखेर महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली.आझाद मैदान पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत, बल्लाळविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.