Join us  

एमएमआरडीए देणार आत्मनिर्भरतेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:57 AM

प्रकल्पात ६३ टक्के स्वदेशी सामग्री वापरण्याचे प्रमाण

मुंबई : स्वदेशात डिझाइन आणि विकसित केलेल्या चालक विरहित मेट्रो रेल्वेची निर्मिती भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या बंगळुरू कॉम्प्लेक्समध्ये केली जात असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पासाठी चालक रहित मेट्रो गाडीचे उद्घाटनदेखील नुकतेच करण्यात आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजघडीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पात ६३ टक्के स्वदेशी सामग्री असून, येत्या दोन-तीन वर्षांत हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ‘आत्मनिर्भर’तेवर भर दिला जात आहे. त्यानुसार चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावर चालविल्या जाणाऱ्या सात मोनोरेलपैकी दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारताच करण्यात आली. त्यातली एक मार्गावर धावत आहे. स्कोमी आणि एल अँड टीकडे मोनोरेलची देखभाल दुरुस्ती असताना मोनो तोट्यात होती. त्यामुळे प्राधिकरणाने मोनोचा ताबा घेतला. मोनोरेलची पुनर्बांधणी करताना देशात तयार करण्यात आलेले सुटे भाग वापरण्यात आले. यानंतर प्राधिकरणाने ‘आत्मनिर्भर’तेवर भर दिला आहे. आता प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पासाठी चालक रहित मेट्रो गाडीचे उद्घाटनदेखील नुकतेच करण्यात आले असून, चालक रहित मेट्रो प्रकल्प म्हणजे इतर भारतीय कंपन्यांना विशेषकरून संरक्षण उद्योगाशी संबंधित उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळे पाच अब्ज अमेरिकी डॉलर्स संरक्षण निर्यात उद्दिष्ट आणि २०२५पर्यंत संरक्षण उद्योग क्षेत्राची उलाढाल २५ अब्ज अमेरिकी डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार आहे, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :एमएमआरडीए