Join us  

रात्रीच्या वेळी डेब्रिस हटविण्याची ‘एमएमआरसीएल’ला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:18 AM

मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून रात्री १० ते १ या वेळेत डेब्रिस हटविण्याची परवानगी उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) गरुवारी दिली.

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून रात्री १० ते १ या वेळेत डेब्रिस हटविण्याची परवानगी उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) गरुवारी दिली. मेट्रो-३ प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असून येथील रहिवाशांना नीट झोपही मिळत नाही, अशी तक्रार करणारी याचिका कुलाबा येथील रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात एमएमआरसीएलला रात्री १० नंतर प्रकल्पाचे काम करण्यास स्थगिती दिली. ही स्थगिती हटविण्यासाठी एमएमआरसीएलने उच्च न्यायालयात अर्ज केला.प्रकल्पामुळे निर्माण होणाºया डेब्रिसची विल्हेवाट दिवसा लावणे शक्य नाही.डेब्रिसने किमान १५० ट्रक भरतात आणि त्यामुळे वाहतुककोंडी होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रकल्पाच्या ठिकाणाहून हे ट्रक नेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती एमएमआरसीएलतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला केली.त्यावर न्यायालयाने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत रात्री १० ते १ या वेळेत डेब्रिसचे ट्रक नेण्यास परवानगी दिली. मात्र हे काम करताना कमीत कमी आवाज होईल, याची काळजी घेण्यासही एमएमआरसीएलला सांगितले.

टॅग्स :मुंबईमेट्रो