पनवेल : शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण ओव्हरफ्लो झाले असून त्यातून पाणीपुरवठासुध्दा सुरू करण्यात आला आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्याकरिता आतापासून उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्र वारी धरणाची पाहणी केली. यावेळी धरणातील जलसाठा, पुरवठा यावर चर्चा करण्यात आली.पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात माती आणि गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडते आणि शहराला पाण्याकरिता इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागते. यंदा एमजेपीकडून झालेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. विरोधकांनी या मुद्द्याचे भांडवल करीत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. शहरात पाणीटंचाई होणार नाही याकरिता आतापासून नियोजन करण्याच्या सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या. त्यांनी शुक्रवारी थेट देहरंग धरण गाठले. त्यांच्यासोबत नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आर.आर. तायडे, संजय कटेकर, सुरेंद्र ऊईके यांच्यासह नगरसेवक इतर अधिकारी उपस्थित होते. धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या विषयावर पाहणी करून चर्चा करण्यात आली. पाणी न आटवता गाळ कसा काढता येईल याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्याची सूचना ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बंधारे बांधून पाणी कुठे अडवता किंवा जिरवता येईल याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांच्यासह कृषी अधिकारी आर.डी. बनकर, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आमदारांनी केली ‘देहरंग’ची पाहणी
By admin | Updated: July 4, 2015 01:02 IST