Join us  

कोस्टल रोड मार्गातून मासेमारी नौकांना ये-जा करण्यासाठी २०० मीटर रुंदीचा चॅनल द्यावा: आमदार रमेश पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 5:03 PM

वरळी कोळीवाडा येथे कोस्टल रोडचे बांधकाम मच्छीमारांनी बंद पाडले 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- वरळी कोळीवाडा येथे शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या  कोस्टल रोडचे बांधकाम येथील मच्छीमारांनी बंद पाडले आहे.भर समुद्रात भराव करून उभारण्यात येत असलेला कोस्टल रोड मार्गातून मासेमारी नौकांना ये जा करण्यासाठी असलेल्या दोन पिलर मधील अंतर 60 मीटर ऐवजी 200 मीटर केल्याशिवाय कोस्टल रोडचे काम सुरू करू नये. तसेच जोपर्यंत मच्छिमारांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पुनर्वसन अथवा भरपाईच्या मुद्द्यावर कोळी समाज बोलणार नसल्याचा ठोस इशारा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपाचे विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी दिला. 

कोस्टल रोडचे काम वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी बंद पाडल्याचे वृत लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाले होते. महानगरपालिकेने मच्छीमारांच्या भावना आणि आमच्या मागण्या रास्त असल्याने त्या शासनापर्यंत पोहोचवाव्या, शासनातील पर्यटन मंत्री आणि वरळी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे आदित्य ठाकरे यांनी समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मार्गिका रुंद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महागडा कोस्टल रोड उभारत असताना कोस्टल रोड खालून समुद्रात येजा करण्याचा मार्ग अरूंद असल्याचे लक्षात आल्यानंतर वरळी कोळीवाड्यातील पारंपारिक मच्छिमरांनी बांधकाम थांबविले होते. त्या अनुषंगाने काल कोळी महासंघाच्या वतीने शिष्टमंडळाने येथील मच्छिमारांची काल दुपारी भेट घेतली असता ते बोलत होते.  यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कोळी महिलांच्या नेत्या राजश्री भानजी, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे कार्याध्यक्ष विकास कोळी, नितेश पाटील, विजय पाटील, रुपेश पाटील आणि वरळी येथील सगळ्या संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरळी वांद्रे सिलिंग उभारताना त्या सी-लिंक मधील वरळी गावातील मासेमारी नौकांना समुद्रात जाण्याच्या मार्गातील चॅनल रुंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता अवघे 30 मीटर रुंदीचा मार्ग ठेवून फसवणूक केली असल्याची भावना तीव्र असताना आता मात्र आम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसून २०० मीटर रुंदी चे चैनल झाल्याशिवाय काम होऊ न देण्याचा निर्धार वरळी येथील मच्छीमारांनी केला आहे. त्याला जाहिर पाठिंबा कोळी महासंघाने दिला.

आमदार रमेश पाटील यांनी आपली आठवण सांगताना सांगितले की, ज्या वेळेला कोस्टल रोड चे नियोजन घोषित करण्यात आले त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. वरळी येथून 30 मीटर चा गेटमार्ग त्यावेळी दाखविण्यात आला होता आपण स्वतः येथील मच्छीमारांच्या सांगण्यावरून सभागृहात आवाज उठवून तो मार्ग साठ मीटर रुंदीचा केला होता. मात्र समुद्राला असणारे भरती ओहटीचे वेगवान करंट लक्षात घेता तो मार्ग 200 मीटर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांना नौका ये जा करण्यासाठी 200 मीटर रुंदीचा मार्ग ठेवावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

मार्ग रुंदी करण्याचा निर्णय शासन घेईल : पालिका आयुक्त 

कोस्टल रोड वरील वरळी येथील मासेमारांना ये जा करण्याचा मार्ग 60 मीटरचा आहे मात्र तो मच्छिमारांच्या मागणीप्रमाणे 200 मीटर करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेण्याबरोबर या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी लागेल आणि त्यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे आपण पाठविणार असल्याचे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आमदार रमेश  पाटील आणि कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने दिले. काल सायंकाळी 5 वाजता पालिका मुख्यालयात त्यांची भेट घेतली असता आयुक्तांनी शिष्टमंडळाला आपली सदर भूमिका विषद केली.

टॅग्स :मुंबई